logo

भाजपच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी एक महिला ठार, चौघी जखमी


नागपूर : भाजपतर्फे बांधकाम कामगारांसाठी आयोजित किचन किट वाटप कार्यक्रमात नियोजन बिघडल्याने चेंगराचेंगरी होऊन एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर 4 महिलांना गंभीर दुखापत झाली. अन्य अनेक महिला किरकोळ जखमी झाल्या. ही घटना शनिवारी सकाळी 11 वाजता शहरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात घडली.
मनुबाई तुळशीराम राजपूत (65) रा. आशीर्वादनगर, असे मृत महिलेचे नाव आहे. तर, पूनम सुधाकर चाडगे (45) रा. रामेश्वरी, शोभा रमेश मसराम (45), नंदा गोल्हर (58) आणि गीता रहांगडाले (60) अशी जखमींची नावे आहेत.
नंदा आणि गीता यांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. पूनम आणि शोभा यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. या घटनेवरून नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे. दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे.
भाजपतर्फे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत नोंदणीकृत कामगारांसाठी स्वयंपाकघर व इतर आवश्यक सामानाच्या वितरणासाठी 8 ते 11 मार्चपर्यंत शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला किट घेण्यासाठी पोहोचल्या होत्या. सकाळी 10 वाजतापासून शिबिराची वेळ होती. मात्र सकाळी 7 वाजतापासूनच भट सभागृहासमोर लाभार्थ्यांची गर्दी जमली होती. हजारो लोक बाहेर उभे होते. 10.30 च्या सुमारास सभागृहाचे प्रवेशद्वार उघडताच आत जाण्यासाठी सर्वांनी धाव घेतली. त्यात गर्दी झाली व काही महिला खाली पडल्या. चेंगराचेंगरीदरम्यान मनुबाईंच्या अंगावरून अनेक जण गेले. त्यांच्यासह अनेक महिला जखमी झाल्या. त्यांना तातडीने मेडिकल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मनुबाईंना मृत घोषित केले. मनुबाई तेथे किट घेण्यासाठी आल्या होत्या. मात्र त्यांना किट ऐवजी मृत्यू मिळाला.

जवळपास 100 जण अंगावरून गेले

पूनम चाडगे मेडिकल रुग्णालयात सुरक्षा रक्षक आहेत. त्यांना कार्यक्रमात शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी होणार असल्याची माहिती मिळाली होती. रात्रभर त्यांनी मेडिकल रुग्णालयात कर्तव्य बजावले. सकाळी 7 वाजता मुलांचे शैक्षणिक कागदपत्र घेऊन भट सभागृहात पोहोचल्या. तेथे आधीच मोठ्या संख्येत महिलांची गर्दी होती. पूनम यांनी सांगितले की, त्या शुक्रवारी दुपारीही भट सभागृहात गेल्या होत्या, मात्र उशिर झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्या सकाळीच तेथे पोहोचल्या होत्या. 10 वाजतापर्यंत तेथे 10 ते 12 हजार महिला आणि पुरूष जमले होते. सर्वांनाच आधी आत जायचे होते. उन्ह वाढत होते. महिलांना भूख, तहाण लागली होती. जवळपास 10.30 वाजताच्या सुमारास प्रवेशद्वार उघडताच सर्वांनी एकाच वेळी आत जाण्यासाठी धाव घेतली. रेटारेटी होऊन त्या जमिनीवर पडल्या. कोणीही थांबायला तयार नव्हते. त्यांनी सांगितले की, जवळपास 100 लोक त्यांच्या अंगावरून गेले. त्यामुळे त्यांच्या पाठ आणि छातीला गंभीर दुखापत झाली. दरम्यान त्यांच्या हातचा कडा, पर्स आणि कागदपत्रही गहाळ झाले.

... तर कशी झाली चेंगराचेंगरी?

पोलिसांनुसार, परिसरात पुरेसे पोलिस बळ तैनात होते. कार्यक्रमासाठी मुख्यालयातून 30 महिला देण्यात आल्या होत्या. कोतवालीचे ठाणेदारही त्यांच्या पथकासह तेथे उपस्थित होते. आम्ही आयोजकांना येणाऱ्या महिलांसाठी मंडप टाकण्यासही सांगितले होते. प्रवेशद्वार उघडताच अचानक धावपळ उडाल्याने ही दुर्दैवी घटना घडली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र प्रश्न निर्माण होतो की, जर पुरेशी व्यवस्था होती तर चेंगराचेंगरी कशी झाली. याचा सखोल तपास झाला पाहिजे.
आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन गरिबीचा गैरफायदा घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,असा आरोप केला जात आहे.

335
3376 views